Tuesday, 23 October 2012

महानतपस्वी प.पू.श्री.गजानन महाराज गुप्ते




जो जाणेल भगवंत| तया नाव बोलिये संत|
जो शाश्‍वत आणि अशाश्‍वत|
निवाडा करी॥
- श्री रामदास
प.पू.श्री. गजानन महाराज हे वर श्री रामदासांनी वर्णन केलेल्या महान पुरूषांपैकी आहेत. अशा अतिमानुष व्यक्ती या उपजतच महान असतात. सर्व गोष्टी कशा विलक्षण घटनांनी घडून आल्या. खरोखर ईश्‍वरी इच्छा ही अद्भुत आणि दुर्ज्ञेय आहे. असेच त्यांच्या चरित्रअवलोकनातून म्हणावे लागते. यांचे संपूर्ण नाव श्री गजानन मुरलीधर गुप्ते. यांचे वडिल कुलाब जिल्ह्यातील पेणचे राहणारे. ते वतनदार कुलकर्णी म्हणून प्रसिद्ध होते. काही दैवी आपत्तीमुळे ते वर्‍हाडात सन १८५१ साली नोकरीकरीता म्हणून आले व त्यांनी बुलढाणा येथे डेप्युटी कमिशनरचे कचेरीत नोकरी धरली. काही दिवस नोकरी धरली. काही दिवस नोकरी केल्यावर या नोकरीवर आपला चरितार्थ चालविणे अशक्य आहे असे आढळून आले. त्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी मराठीतूनच वकिलीचा अभ्यास सुरू केला व ती परिक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी यवतमाळ येथे वकिली सुरू केली. त्यांची वकिली उत्तम चालली. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांना पाच मुलगे व तीन मुली होत्या. पैकी वडिल मुलगा नारायण, दुसरा रामचंद्र, तिसरा केशव, चौथा लक्ष्मण व पाचवा गजानन हेच पुढे गजानन महाराज म्हणून प्रसिद्धीस पावले. यांचा जन्म इ.सन १८९२ साली झाला. त्यांच्या वयाच्या तिसर्‍या वर्षीच अतिशय देवी आल्या व त्यामुळे त्यांचा उजवा पाय कायमचा निकामी झाला.
पुढे माता-पिता दोघेही आजारी पडून १-२ महिन्याच्या फरकाने अमरावती येथेच परलोकवासी झाले. आईने इहलोक सोडण्यापूर्वी आपली वडील बहीण बाळूबाई यांना जवळ बोलावून गजाननाचा हात तिचे हातात दिला व म्हणाली, ‘‘माझा आता भरवसा नाही. हा माझा गजानन पांगळा आहे हे तू पहाते आहेस. त्याची आई आता तूच हो व कोणातरी सत्पुरूषाचे पायावर घालून त्या सत्पुरूषाची त्याचेवर कृपा होईल असे कर. त्यांच्या आशिवार्दाने व कृपादृष्टीने त्याचे पुढे कल्याण होईल’’ असे सांगून त्या स्वाध्वी स्त्रीने इहलोक सोडला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पुढे सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणेच घडून आल्या.
गजाननाची मावशी बाळूबाई ही बालविधवा होती. ती गजाननाची फार काळजी घेत असे. तिने एकाप्रसंगी गजाननास श्री नारायण सरस्वतींच्या पायावर घातले. बाल गजाननाने महाराजांचे पाय घट्ट धरून त्यांच्या पायावर आपले डोके ठेवले. तेव्हा महाराजांची प्रार्थना करून मावशी म्हणाल्या, महाराज, या लंगड्या पंागळ्या लेकरावर दया करा. याचे आईबाप निवर्तले आहेत व हा पोरका झाला आहे. याचे पुढे कसे होणार हे समजत नाही. ईश्‍वराशिवाय याचा रक्षणकर्ता दुसरा कोणी नाही. आपण ईश्‍वररूप महान साधू आहात. ईश्‍वराच्या सर्व शक्ती आपल्या ठिकाणी वसल्या आहेत. म्हणून या लेकराला पदरात घ्या.’
मावशींच्या कळकळीच्या या शब्दांनी महाराजांना फार समाधान वाटले व तिच्याकडे वळून ते म्हणाले, आई, तुम्ही दोघी बहिणी पूर्वजन्मी योगाभ्यासी होता. तुमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने हा योग घडून आला आहे. हा गजानन पूर्वजन्मी योगी होता. काही वर्षांनी हा महान साधू म्हणून प्रसिद्धीस येईल व अध्यात्म मार्गावरील पुष्कळ साधकांना हा उत्तम प्रकारे मार्गदर्शक होईल. त्यांच्या डोळ्यातील बाहुल्यावरून हा पूर्वी नाथपंथी योगी असावा याबद्दल तुम्ही मुळीच काळजी करू नका. पण आई, तुम्ही मात्र त्याचा उज्वल किर्तीसमय पाहण्यास राहणार नाही. तरीपण त्याची वाढती किर्ती जेव्हा थोडीतरी तुमच्या कानावर येईल तेव्हा त्याच्या संबंधीची तुमची काळजी दूर होईल.
नंतर महाराजांनी सर्वांना जेवण उरकून घेण्यास संागितले. सर्वजण झोपी गेले. गजानन मात्र झोपी गेलेला नसून अर्धवट जागा असा अंथरूणावर बसून होता. अशा स्थितीत त्यास पुढील दृष्टांत झाला.
जिकडे तिकडे दाट अंधार पडला आहे. त्यातून आपण चालत जात आहोत असे गजाननास कळून आले. मधून मधून त्याला एक तारा दिसे. पुन्हा अंधार होई पर्जन्यही होत आहे. मेघगर्जना चालली आहे. विजा चमकत आहेत व सर्व रस्ता सर्पांनी भरलेला आहे. त्यात काही काळे, काही पांढरे, काही कवडे काही माणसाच्या मांडीएवढे पुष्ट होते. सर्पांनी तर गजाननाच्या पायाला व कमरेला विळखा घातला व तो डोक्यावर चढू लागला. गजानन मात्र पुढे पुढे चालतच होता. चालताना त्याचे शरीर दणकट व धिप्पाड झाले व तो सर्वांना बाजूला करीत पुढे पुढे चालत होता. त्याला भीती वाटे परंतू एक प्रकारचा अनुभूत आनंदही वाटे आपण किती चाललो याचा त्याला अंदाज नव्हता. परंतू लवकरच त्याचे शरीर हलके होत चालले. सर्प तेथेच होते पण आता काळोख मात्र नव्हता. सर्व बाजूंनी स्वच्छ प्रकाश होता व तेथे एक सुंदरशी समाधी होती. ती सर्व प्रकारच्या फुलांनी सजविलेली होती. सुवास दरवळत होता एका बाजूस निरांजन तेवत होते. कापूर जळत होता. जवळच एक सुंदर तरूणी उभी होती. तिच्या कमरेस एक सोन्याचा पट्टा असून त्यास लखलखीत तलवार लटकत होती. गजानन तिला नमस्कार करणार इतक्यात ती अदृश्य झाली. गजाननास फार आश्‍चर्य वाटले व आनंदही झाला. ही कोणाची समाधी असेल असा विचार मनात येताच ती समाधी दुभंगून तिच्यातून डोळे दिपविणारी एक तेजस्वी दिव्य, मनुष्यकृती प्रकट झाली. आदेश ओम् हंस: सोऽहम् ब्रह्मं: असा मोठा आवाज झाला. गजाननास तर तो आवाज त्याच्या शरीरातूनच निघत आहे असे वाटले. त्या दिव्य व्यक्तीस लांब दाढी असून तिने केशरी रंगाची कफनी परिधान केली होती. गळ्यात रूद्राक्ष माळा होत्या. डोक्यावर जटांचा मुकूट होता. तिच्या तेजाने गजाननाचे डोळे दिपून गेले व हंस: सोऽहम् हा ध्वनी मुर्तीच्या मुखातून निघत होता. तरी तो आपल्याच मुखातून निघत आहे असे त्यांना वाटले. नंतर त्या व्यक्तीने सौम्य रूप धारण केले व मच्छिंद्र आदेश असा आवाज होऊन तो सर्व देखावा एकदम अदृश्य झाला.
नंतर गजानन पूर्ण जागा झाला. त्याचे शरीर घामाने अगदी ओले झाले होते. कपडे भिजले होते. त्याच्या अंगातून सुवास पसरत होता. सूर्य उगवला होता. सर्वत्र प्रकाश होता. परंतू गजाननाच्या डोळ्यासमोर अंधारच होता. तो भांबावल्यासारखा दिसत होता. मावशी घाबरल्या व लगेच गजाननास घेऊन महाराजांकडे लगबगीने आल्या.
गजाननास त्यांनी पायावर घातले. तेव्हा महाराज मावशीकडे वळून म्हणाले, आता तरी तुला समजले का हा योगी आहे. ह्याची आता मूळीच काळजी करू नकोस.
नंतर ते गजाननास म्हणाले, तुला जो स्वप्नात मंत्र मिळाला तो मला म्हणून दाखव. तो मंत्र त्याच्या कानात व शरीरात सर्वत्र घुमत होता. आदेश ओम् हंस: सोऽहम् असे शब्द त्याने ऐकले होते परंतू आता फक्त ‘सोऽहम्’ हेच शब्द आठवले. तेव्हा एवढ्या लहान वयात तुला देवीचे व मच्छिंद्रनाथांचे दर्शन झाले. खरे ना बाळ! असे ते मोठ्या कौतुकाने म्हणाले. जगात तुझी किर्ती वाढेल व तुझ्यापासून पुष्कळ मुमुक्षूजनांचे कल्याण होईल. तू सदैव आत्मानंदात निमग्न राहशील. ते पुढे म्हणाले, तुझ्या श्‍वासात तुला माझे निरंतर दर्शन होईल.
खरोखर, महाराजांच्या आशीर्वादाप्रमाणे श्री गजानन कृपेने अनेक मुमुक्षूजन सिद्धावस्थेत पोहोचले.
त्यापैकी प.पू.श्री दादामहाराज आंबेकर, पुणे, प.पू.श्री.नानामहाराज पाठक सोलापूर, प.पू.श्री.मधू चिटणीस नाशिक, प.पू.श्री.डॉ.गणेश त्र्यंबक कारखानीस उर्फ प.पू.भाईनाथ महाराज, वेळापूर, प.पू. श्री.म.ल. अकोलेकर, नाशिक, प.पू.श्री.काशीनाथ भिमाजी सूर्यवंशी चांदोरी, नाशिक यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. इतकेच काय परंतू महाराजांचे अज्ञात अधिकारी शिष्य किती होते हे शेवटपर्यंत अज्ञातच राहिले. महाराज म्हणत आमचे आडनाव गुप्ते व आमचा मार्गही गुप्त. त्यांना प्रसिद्धीचा फार कंटाळा ते शेवटपर्यंत नाशिकला चित्रघंटा लेनमधील त्यांच्या गजानन निवासी होते. ते सतत चहा पिऊन रहात. अन्न घेत नसत. त्यांचे शरीर अतिशय कृश होते. परंतू ते कधी मोठ्या सशक्त व्यक्तीला उचलत नसत. त्यांच्या मनात असेल तर लहान मुलगाही त्यांना उचलून कडेवर घेई. ते सतत आत्मनंदात लीन असत. ते म्हणत, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता, हे महत्वाचे. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच असे करत बसला तर उभे आयुष्य पुरणार नाही. तुम्ही तुमचे गुरू व्हा व सुरूवात करा. बारिक सारीक गोष्टीने तुमचा जो स्वायत्त आनंद आहे तो बिघडू देऊ नका. तीव्र मुमुक्षूने वाचन बंद केले पाहिजे व दृढ निश्‍चयाने चिकाटीने व श्रद्धेने सतत अभ्यास निदिध्यास चालू ठेवला पाहिजे. साधकाचे अंत:करण शुद्ध पाहिजे. गुरूवर पूर्ण विश्‍वास पाहिजे. गुरू सांगतील तेच शास्त्र अशी दृढ भावना ठेवली पाहिजे. अभ्यासात चुकारपणा नको. आपल्या सुखदु:खाचे मूळ आपण करीत असलेली कर्मे नसून, त्या कर्माच्या मागे असलेला हेतू होय. तेव्हा कर्तव्यकर्मे म्हणून कर्मे करीत जा, यशापयशाची पर्वा ठेवू नका. त्याने शांतिभंग होणार नाही. जेव्हा मनुष्य प्रेमस्वरूप होतो तेव्हा त्याने सर्व जग जिंकलेले असते. मनात नाना प्रकारचे तर्क कुतर्क संशय निर्माण होणे हे अनेक जन्मातील कुसंस्काराचे सहज फल आहे. परंतू उठता बसता सतत जपाची आवृत्ती होत राहील तर मनाच्या गढूळ अवस्थेचा नाश होईल. आपल्या ऐच्छिक वासना क्षीण होत जातात की नाही याकडे लक्ष असावे. वासनामय होत जाणे व सहजपणे संकल्प न करता हातून कर्मे होत राहणे ही अध्यात्मिक प्रगतीची लक्षणे आहेत. कोणत्याही गुरूजवळ रात्रंदिवस राहण्याचे मुळीच कारण नाही. ज्याने त्याने आपल्या जागी राहून व्यावहारिक गोष्टी करीत असावे व केवळ गुरूशी सोऽहम् मंत्राने सतत अनुसंधान ठेवावे अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणे हे मनाच्या स्वभावास अनुसरून आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कल्पना उत्पन्न होणारच आपण अशा कल्पनांची फिकीर करू नये. संकल्प विकल्परहीत मन असणे कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणे, सुखदु:खातीत असणे, प्रकृती गुणधर्माप्रमाणे सहज कृती होणे अशी निर्भय निरहंकारी, निरामय अवस्था झाली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असे समजावे असे प.पू.गजानन महाराज म्हणत.
अशा ह्या प्रसिद्धी पराडमुख नाथपंथीसिद्ध  महापुरूषाचे नाशिक येथे २८ सप्टेंबर १९४६ (अश्‍विन शु.३) रोजी रात्री अकरा वाजता महानिर्वाण झाले.
श्री क्षेत्र नाशिक येथे गोदावरी तिरी यशवंत महाराज पटांगणात प.पू.गजानन महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या समाधी मंदिरात महाराजांचे शिष्य प.पू.मधू महाराज चिटणीस व प.पू.डॉ.भाईनाथ महाराज कारखानीस यांची समाधी आहे. अश्‍विन शुद्ध तृतीयेस प.पू.गजानन महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो.

सोऽहम् सोऽहम् जप करी मना |
सोऽहम् भावें सांडिली बाह्यपूजा ॥
सोऽहम् रूपे आणिले आत्मराजा |
सोऽहम् शब्दें दैखिलें त्या गुरूसी |
सोऽहम् तत्वें तारितो जो दिनांसी ॥

5 comments:

  1. Soham Sadhana laid down at Guru paduka by Sri. Gajan Maharaj Gupte bestows person to raise out of religious leve to spiritual leve which cleans him from soul in body and motivates to achieve goal of self life "Soham"

    ReplyDelete
  2. I had come across a pdf of Shri Gajanan Maharaj Gupte's biography. I am unable to find it now. Can you please point me to it? Thank you.

    ReplyDelete
    Replies
    1. It is light on the path of self realisation. Atmasakshatkarmargpradeep. Tyachi PDF online aahe available

      Delete
  3. P P Gajanan Maharaj Gupte ya paramparetil adhikari disciples koni astil tar please guide kara..
    Prof. Manoj Muley, Panvel, Raigad
    9819540448

    ReplyDelete